मृदा संवर्धन Soil Conservation
Soil Conservation : नैसर्गिक साधनसंपत्तीच्या व्यवस्थापनामध्ये मातीला संधारणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. मृदा आणि जलसंधारणामध्ये माती आणि पाण्याला विशेष प्राधान्य दिले जाते. दरवर्षी जलचक्रामुळे कमी-जास्त प्रमाणात तरी पाऊस पडतो, मात्र मृदा निर्मितीची प्रक्रिया ही त्या तुलनेत प्रदीर्घ काळाची आहे.
मृदा संधारण/संवर्धन : मृदा संवर्धन म्हणजेच शेतजमिनीचे धुपीपासून संरक्षण करणे. शेतजमिनीचे प्रमख कार्य म्हणजे विविध पिके निर्माण करणे. त्यासाठी शेतजमिनींचा योग्य वापर करून तिचा कस कायम राखणे अत्यंत महत्वाचे ठरते परंतु अनेक कारणांमुळे जमिनीची उत्पादनक्षमता घटते आणि ती राखण्यासाठी योग्य उपाय योजिले जातात, त्या सर्वांचा समावेश मृदा संवर्धना खाली होतो. शेतजमिनीची सुपीकता तिच्या वरच्या थरांतील मातीच्या सूक्ष्म कणांवर अवलंबून असते म्हणून त्यांचे संवर्धन करणे ही अत्यंत महत्त्वाचे ठरते.
जमिनीतील अशा सूक्ष्म क्रियाशील कणांचा अपव्यय अनेक कारणांनी होतो. त्यालाच आपण जमिनीची धूप असे म्हणतो. आती वृष्टी वारंवार येणार पाऊस जोराचे वारे, तसेच जोराने वाऱ्याच्या झोताने आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहगतीमुळे माती वाहून नेली जाते. सर्वसाधारणपणे 2.5 सेंमी.जाडीचा मातीचा थर तयार होण्यास सु. 400 ते 1000 वर्षांचा काळ लागतो. जमिनी नैसर्गिक आवरणाखाली राखल्यास माती वाहून जाण्याची क्रिया मंद होते आणि त्यामुळे नैसर्गिक समतोल राखला जातो. परंतु मानवाच्या गरजा सतत वाढत्या असल्यामुळे नवीन नवीन जमिनी लागवडीखाली आणण्यात आल्या व त्यासाठी जमिनीवरील नैसर्गिक आवरणे दूर करण्यात आली. जंगलतोड झाली, गवती राने नांगरली गेली आणि पर्यायाने जमिनीची धूप होऊ लागली व तिचा कस कमी कमी होऊन उत्पादनक्षमता घटू लागली.
मानवाने शेती करण्यास सु. 7000 वर्षांपूर्वी सुरुवात केली आणि त्यासाठी जमिनीवरील नैसर्गिक आवरण हलके हलके दूर करण्यास सुरुवात झाली. सुरुवातीस मानवाची गरज फार थोडी असल्याने त्याच्या हस्तक्षेपाचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून आला नाही परंतु लोकसंख्या जसजशी वाढत गेली आणि मानवी गरजांचे प्रमाण वाढू लागले. तसतशी नवीन जमीन लागवडीखाली आणण्यात आली. त्यासाठी वनक्षेत्रावर आक्रमण करून जंगलतोड झाली, गवती रानातील गवत काढून नंतर त्यांची नांगरट करण्यात आली. अशा रीतीने जसजसे नैसर्गिक आवरण कमी होत गेले व मानवी हस्तक्षेप वाढत गेला तसतशी जमिनीची धूप मोठा प्रमाणात होऊ लागली आणि त्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाल्या.
या मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या धुपीस ‘गतिवर्धनशील धूप’ असे म्हणतात. या वेगवर्धक धुपीचा इतका प्रचंड वेग असतो की, निसर्गाने जमीन बनविण्याचे केलेले हजारो वर्षांचे कार्य काही दिवसांतच नष्ट होते. अशा बेलगाम धुपीमुळे निसर्गाचा समतोल बिघडतो आणि त्यांचे दुष्परिणाम वर विशद केल्याप्रमाणे दिसून येत आहेत. जमिनीच्या धुपीच्या समस्येस यशस्वीपणे तोंड देण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी तिच्या विविध कारणांविषयी व त्यांमुळे होणाऱ्या धुपीच्या प्रमाणाबाबत संशोधन केले आणि त्याचे गांभीर्य शेतकऱ्यांस पटवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच ही हानी टाळण्यासाठी अगर तिचे प्रमाण कमी करण्यासाठी काही उपाय शोधून काढले व त्यांचा शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास केला.
मृदा निर्मितीची प्रक्रिया
निसर्गात हवा, पाणी, सूर्याची उष्णता व इतर भौतिक आणि रासायनिक कारकांमुळे खडकांची झीज होते आणि खडकांचा बारीक चुरा तयार होतो. कालांतराने त्यामध्ये विविध जैविक घटक मिसळतात आणि त्याचे मातीमध्ये रूपांतर होते. अशा प्रकारे एक इंच मातीचा थर तयार होण्यासाठी साधारणत: 800-1000 वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे मातीचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे.
मातीची धूप आणि त्याचे होणारे दुष्परिणाम
शेतीच्या दृष्टीने विचार केला असता, मातीचा वरचा फक्त चार इंचांचा थर शेतीसाठी उपयुक्त असतो. कारण याच थरामध्ये पिकांच्या वाढीसाठी लागणारी सर्व पोषकद्रव्ये उपलब्ध असतात. जर मातीच्या संवर्धनाच्या उपाययोजना केल्या नाहीत तर पाण्यासोबत पिकांना आवश्यक असणारी पोषकद्रव्येसुद्धा वाहून जातात.

परिणामी, जमिनीची सुपीकता कमी होते. पीक उत्पादनात मोठी घट होते. शेतकऱ्याला रासायनिक खते कीटकनाशके इ. बाह्य साधनांचा आधार घ्यावा लागतो. काही ठिकाणी मातीचा थर हा मर्यादित असतो. अशा ठिकाणी मातीची धूप झाल्यास हळूहळू मातीचा संपूर्ण थरच वाहून जातो.
खडक उघडा पडतो. अशा ठिकाणी भविष्यात पुन्हा शेती करणे अशक्य होऊन बसते. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मृदा संधारणेची कामे करणे आवश्यक असते. ती झालेली नसल्यास पाण्याच्या प्रवाहासोबत मोठ्या प्रमाणात गाळ वाहून येऊन धरणात साठतो. परिणामी, धरणाची पाणी साठवणुकीची क्षमता मोठ्या प्रमाणात घटलेली आहे.
म्हणजेच सुपीक मातीचा थर सांभाळण्याची आवश्यकता वेळीच जाणून न घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम आपल्याला पुढच्या काळात भोगावे लागतील. यामुळे मृदा संधारण करणे गरजेचे बनले आहे.
जमिनीचा पोत टिकवणे महत्त्वाचे…
जमीन, जमिनीची उत्पादन क्षमता ही निसर्गाची देणगी आहे. जमिनीचे गुणधर्म आणि उत्पादन क्षमता टिकवणे हे आपले प्रमुख कर्तव्य आहे. म्हणून वातावरण, जमीन आणि पाणी या तीनही घटकांना हानी करणारी किंवा निसर्गाचा समतोल बिघडवणारी कोणतीही शेतीची मशागत शेतकऱ्यांनी टाळली पाहिजे. मानवास आवश्यक असणाऱ्या मूलभूत गरजा डोळ्यासमोर ठेवून नियोजन केले पाहिजे.
भारतात सर्वाधिक लोकसंख्येचा भार असल्यामुळे त्या लोकांच्या पोषणाची निर्भरता वर असल्यामुळे शेती उत्पादनाला सर्वाधिक महत्त्व द्यावे लागते. लागवडीखालील क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता फारच कमी आहे. अशा स्थितीमध्ये शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली.
त्यात अधिक उत्पादन देणारे वाण, रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके, बुरशीनाशके इ.चा वापर केल्यामुळे आपण अन्नधान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण झालो. स्वातंत्र्यानंतर हरितक्रांती घडवून आपल्या देशाने शेती व्यवसायातील क्षमता सिद्ध केली आहे. मात्र पिकांचे उत्पादन वाढविताना जमिनीचा पोत, सुपीकता राखण्यात कमतरता राहिल्याचे गेल्या काही वर्षांतील अभ्यासातून आणि उत्पादनातून पुढे येत आहे.
जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणि आवश्यक जिवाणू यांचे प्रमाण कमी होत गेले. त्याचा फटका जमिनीच्या आरोग्य बिघडण्याच्या स्वरूपात बसत आहे. शेतीचे क्षेत्र आणि त्यामुळे जनावरांची संख्या कमी झाल्यामुळे शेणखत आणि सेंद्रिय खतांची कमतरता जाणवत आहे. सातत्याने आणि सलग पिके घेतली जात असल्यामुळे जमिनीवरील ताण वाढत आहे. या सर्व घटकांचा परिणाम जमिनीच्या सुपीकतेवर होत आहे. जमिनी नापीक होत आहेत.
जमिनीचं संतुलित वापर
पीक उत्पादनातील सर्वांत महत्त्वाचा प्राथमिक घटक म्हणजे माती आहे. याच मातीमध्ये पुरातन काळापासून शेतकरी विविध पिके घेत आला आहे. मात्र पूर्वी सेंद्रिय खते अधिक प्रमाणात दिले जात. त्याचा फायदा जमिनीचा पोत टिकण्यास आपोआप होत असे.
मात्र कमी होत असलेल्या जमीनधारणेमध्ये शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होण्यासाठी आणि एकूणच अन्नधान्याची वाढती गरज भागविण्यासाठी अधिक उत्पादन मिळविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत गेला. त्यात अधिक उत्पादनक्षम अशा संकरित वाणांचा वापर वाढत गेला. सिंचनाच्या विविध सोयी उपलब्ध झाल्या.
आज बहुतांश शेतकरी सर्व हंगामात पिके घेण्याचा प्रयत्न करतात. त्यातही बागायती क्षेत्रात तिन्ही हंगामांत पिके घेताना आंतरपिके, दुबारपिके, इ. पीक पद्धतीसोबतच पीक घनता वाढली. या पिकांची वाढत्या अन्नद्रव्यांची मागणी पुरविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. मात्र त्यातही संतुलित खत वापराकडे लक्ष देण्याची आवश्यकता असताना शेतकरी उपलब्ध असलेल्या काही ठरावीक खतांना (केवळ नत्र, स्फुरद आणि पालाश) प्राधान्य देताना दिसतात.
खरेतर पुरेशा प्रमाणात सेंद्रिय खतांची पूर्तता करतानाच दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये. एकात्मिक खत व्यवस्थापनातूनच जमिनीची सुपीकता आणि पिकांची उत्पादकता जपणे शक्य होणार आहे. ज्या ठिकाणी सिंचनाची उपलब्धता आहे, तिथे पाण्याचा असंतुलित व बेसुमार वापर यामुळेही जमिनीवर विपरीत परिणाम होत आहे. अशा अनेक कारणांमुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक अशा नैसर्गिक गुणधर्माची हानी झालेली दिसते
अशे करावे मृदा संवर्धन
- शेतातील मातीचे परीक्षण करणे व माती परीक्षण अहवालानुसार खतांची मात्रा देणे.
- रासायनिक खतांचा असंतुलित वापर टाळणे.
- शेणखत, कंपोस्ट खताचा पुरेपूर वापर करणे.
- जिवाणू खतांसारख्या नैसर्गिक साधन संपत्तीच्या वापरावर भर देणे.
- ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर करणे.
- पिकांच्या शास्त्रीय पद्धतीने फेरपालट करणे.
- पिकांच्या शेतातील तणे, शिल्लक अवशेष योग्य प्रकारे कुजवून वापर करणे.
- तणांचा वाढणारा प्रादुर्भाव टाळणे.
आमची माहिती आवडल्यास आमच्या whatsapp चॅनल व facebook पेजला नक्की follow करा.